मुंबईशहर

बोरिवलीच्या चिकूवाडीत पाम उद्यानासुगंधी उद्यान


मुंबई : प्रतिनिधी: बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडीत ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने करुन दाखवल्याने या परिसराचे रुपच पालटले आहे. कधीकाळी निर्मनुष्य भासणारा हा परिसर आता उद्यानांमध्ये येणाऱया आबालवृद्धांमुळे फुलून जातो. विशेष म्हणजे, या दोन्ही उद्यानांमध्ये असणाऱ्या शोषखड्डयांमुळे रिंगवेलद्वारे उपलब्ध होणारे पाणी उद्यानातील सिंचनासाठीच पुनर्वापरात येते. परिणामी दररोज सुमारे ३० ते ४० हजार लीटर पाण्याची बचत करण्याची किमया देखील या उद्यानांनी साध्य केली आहे.

बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडी येथे वसंत संकूल मागील परिसरात, मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेला सुमारे ५ एकर क्षेत्रफळाचा भूखंड सन २०१३ मध्ये महानगरपालिकेच्या ताब्यात आला. त्यावेळी ही जागा ओसाड स्वरुपाची व काहीशी दुर्लक्षितच होती. या भूखंडांच्या बाजूने एक मोठा नाला देखील वाहतो. स्वाभाविकच सदर परिसराच्या भौगोलिक विकासाला चालना मिळत नव्हती. त्यामुळेच हा परिसर काहीसा निर्मनुष्य होता. यावर उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने मनोरंजन मैदानासाठी आरक्षित या जागेवर उद्यान विभागाच्या माध्यमातून संकल्पीय उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

या जागेच्या मधोमध रस्ता जात असल्याने एका बाजूस पाम उद्यान तर दुसऱ्या बाजूस सुगंधी उद्यान ही संकल्पना निश्चित करुन उद्यानाची निर्मिती सुरु करण्यात आली. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने टप्प्या-टप्प्याने रोप लागवड करीत ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत दोन्ही उद्याने तर फुलवलीच, पण त्यातून संपूर्ण परिसराचा कायापालट देखील घडून आला. या उद्यानांमध्ये कोणतेही मोठे स्थापत्य बांधकाम करण्यात आले नसल्याने, अत्यंत वाजवी खर्चात उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे, हे विशेष! जवळपास ७ हजार ७९५ चौरस मीटर जागेवर फुललेल्या पाम उद्यानाचे ‘गोपीनाथजी मुंडे मनोरंजन मैदान’ तसेच ६ हजार ८६२ चौरस मीटर जागेवरील सुगंधी उद्यानाचे ‘प्रमोदजी महाजन मनोरंजन मैदान’ असे नामकरण करण्यात आले आहे. या मैदानांवर फेरफटका मारणे म्हणजे निवांतपणाची सुखद अनुभूती ठरते आहे. नेत्रसुखद हिरवळ आणि आसमंतात दरवळणारा सुगंध यामुळे नागरिकांची पावले आपसूकच या उद्यानांकडे वळतात. परिसरातील इमारतींमधूनही या उद्यानांचे सुंदर विहंगम रुप दिसते. बोरिवलीतील आकर्षक स्थळ म्हणून ही उद्याने आज मिरवत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button