मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महापालिकेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव 2017 मध्ये पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात या करातील फक्त दहा टक्के सर्वसाधारण कर माफ करण्यात आला असून अग्निशमन कर, जल कर, मलनि:सारण कर, पथ कर, पालिका आणि राज्य सरकारचा शिक्षण कर, वृक्ष कर व रोजगार हमी कर या करांची आकारणी केली जाते आहे.
सर्वसाधारण करांव्यतिरिक्तचे हे 9 कर देखील माफ करण्याची मागणी राजकीय पक्षांनी राज्य सरकारने केली आहे. मात्र पालिका आणि सरकारच्या उत्पन्नात घट होणार असल्याने या करांची आकारणी सुरूच आहे. हे 9 कर देखील माफ करावेत, यासाठी पालिका सभागृहाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून त्यावर निर्णय झालेला नाही. राज्यात शिवसेना विकास आघाडी सरकार येऊन दोन वर्षे लोटूनही मुंबईकरांना मालमत्ता करात माफी मिळालेली नाही. अवघा दहा टक्के कर माफ करून मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. मुंबईनंतर आता ठाण्यातील 500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफी करण्याचा ठाणे महापालिका सभागृहात निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होईल की नाही हे स्वतः शिवसेना नेतेहीही सांगू शकत नाही. 500 चौरस फूट सदनिकाधारकांना अद्यापपर्यंत कर माफी मिळाली नसल्यामुळे 500 ते 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करात सवलत देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पालिकेतील करनिर्धारण विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेने केवळ मुंबईकरांना खुश करण्यासाठी निवडणुकीमध्ये स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केल्याचे सिद्ध होते.