
मुंबई : प्रतिनिधी
गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्प’ हा महानगरपालिकेने हाती घेतलेला पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या जोडरस्त्याने मुंबई उपनगरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा चौथा जोडरस्ता उपलब्ध होणार आहे. या जोडरस्त्याची लांबी १२.२ कि.मी. असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व ) येथील ओबेरोय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे.
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी गोरेगाव मुलुंड जोडरस्ता तयार करण्यात येत आहे. हा रस्ता पाच मार्गिकांचा असून या जोडरस्त्याच्या कामामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणाऱ्या ४.७ कि.मी. लांबीच्या व १३ मीटर व्यासाच्या जोडबोगद्याचा आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातून जाणाऱ्या १.६० कि.मी लांबीच्या पेटी बोगदा आणि त्यांचे पोहोच रस्त्यांचे बांधकामाचा समावेश आहे. सदर बोगदे तीन मार्गिकेचे आहेत. गोरेगाव बाजूकडील जोडरस्त्याचे ओबेराय मॉल ते फिल्म सिटी २.८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मुलुंड बाजूकडील ‘तानसा पाईप लाईन’ ते ‘पूर्व द्रुतगती मार्ग जंक्शन’ पर्यंतच्या २.७ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि नाहूर रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. ही कामे सन २०२२-२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या जोडरस्त्यावर होणारी संभाव्य वाहतूक विचारात घेऊन गोरेगांव पूर्व येथील दिंडोशी न्यायालयाजवळून संतोष नगर येथील चौकापर्यंत जाणारा १.२९ किमी लांबीचा तीन मार्गिकेचा उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. या कामांमध्ये दिंडोशी न्यायालयाजवळ पादचाऱ्यांसाठी ‘जीएमएलआर रस्ता ओलांडण्याकरिता स्वयंचलित सरकत्या जिन्यासह पादचारी पूल प्रस्तावित आहे. मुलुंड (पश्चिम) खिंडिपाडा येथील गुरु गोविंद सिंग रस्ता, गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता आणि खिंडिपाडा येथील भांडूप जलशुद्धिकरण संकुलाचा रस्ता यांच्या चौकातील स्थानिक वाहतुकीसाठी उच्चस्तरिय चक्रीय मार्ग प्रस्तावित आहे. तसेच या कामामध्ये खिंडीपाडा जवळील पादचाऱ्यांसाठी जीएमएलआर रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल हा स्वयंचलित सरकत्या जिन्यासह प्रस्तावित आहे. डॉक्टर हेडगेवार चौक येथे १२० मीटर पूल ‘केबल स्टे’ स्वरुपाचा आहे. तर ‘मुंबई मेट्रो-४’ च्या खालच्या पातळीवर म्हणजे पहिल्या स्तरावर ‘जीएमएलआर’ उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या दोन उड्डाणपूलांचा कंत्राट खर्च ६६६.०६ कोटी इतका असून कामाचा कालावधी ३६ महिने आहे.