मुंबई : प्रतिनिधी
रस्त्यांच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने आठ गुणवत्ता व्यवस्थापन संस्थांची नियुक्ती केली आहे. दिलेल्या निकषाप्रमाणे कंत्राटदार रस्ते बांधणी कर्ट्ट की नाही, याची खातरजमा करण्यासाठी पालिका प्रशासनासोबत या गुणवत्ता व्यवस्थापन संस्था देखील लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे उत्कृष्ट रस्त्यांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईकरांना दर्जेदार नागरी सेवा-सुविधा देताना पायाभूत सुविधांमध्ये देखील सातत्याने गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला जात आहे. पायाभूत सुविधांमध्ये प्रामुख्याने चांगले रस्ते असणे अनिवार्य आहे. मुंबई महानगरातील वाहतुकीचा प्रचंड भार, पर्यायाने रस्त्यांचा सातत्याने होणारा वापर, विविध नागरी कामांसाठी रस्त्यांचे होणारे खोदकाम, त्यांची पुनर्बांधणी, मुंबईच्या भौगोलिक स्थितीमध्ये रस्ते सुस्थितीत राखणे, ह्या सर्व बाबी लक्षात घेता रस्ते परिरक्षित करणे, एक मोठी आव्हानात्मक बाब आहे. त्यामुळे रस्ते पुनर्बांधणी करताना त्यातील गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका प्रशासनाने गुणवत्ता व्यवस्थापन संस्थांची नियुक्ती केली आहे.
मुंबईत छोटे-मोठे मिळून सुमारे २ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पैकी आजमितीस जवळपास १ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झालेले आहे. यावर्षी महानगरपालिकेने जवळपास २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याचे काम रस्ते विभागातील अभियंते यांच्या देखरेखीखाली करण्यात येते. असे असले तरी, रस्ते विभागातील अधिकारी, अभियंते यांना प्रशासकीय कामकाज, क्षेत्रीय कामकाज सांगड घालून प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर देखील लक्ष ठेवावे लागते. त्यातून निर्माण होणारा ताण लक्षात घेता आणि रस्ते बांधणीतील गुणवत्ता राहण्याचे महत्त्व लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या सुचनेनुसार महानगरपालिकेने रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापन हमी देतील अशा प्रतिनिधी संस्थांची नेमणूक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या एकूण सात परिमंडळांसाठी मिळून आठ संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे.