मुंबई

महापालिका मुंबईत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना रोखणार !

वातावरण कृती आराखडा अंमलबजावणी लवकरच

मुंबई : प्रतिनिधी
2050 पर्यंत मुंबईचे महत्त्वाचे चार भाग पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर नरीमन पॉईन्टचा 80 टक्के भाग पाण्याखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अशी नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी वातावरण कृती आराखडा तयार करण्यात आला असून याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
वातावरण कृती आराखडा अहवाल रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालिका आयुक्त यांनी विकास करण्याच्या घाईमध्ये माणसाने अनेक गोष्टी गमावल्या. पर्यावरण बदल हा त्याचाच दुष्परिणाम आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर देखील सुधारणेला नेमकी कोणी सुरुवात करायची याची जगभरात द्विधा मनस्थिती असताना पालिकेने मुंबई वातावरण कृती आराखड्यातून सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे. विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत टिकणारा असला पाहिजे. मुंबई वातावरण कृती आराखडा हा देशातीलच नव्हे तर बहुदा जगातील पहिला वातावरण कृती आराखडा असावा, असे पालिका आयुक्तांनी यावेळी सांगितले.
गारगाई पिंजाळ धरणाचा प्रकल्प अहवाल तयार असताना पाच लाख झाडे वाचवण्यासाठी हा प्रकल्प रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वातावरण कृती आराखड्याची औपचारिक सुरुवात तेव्हाच झाली होती. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प, नियोजित मलनिस्सारण प्रकल्प, नि:क्षारीकरण (समुद्राचे पाणी गोडे करणे) प्रकल्प, गोरेगांव मुलुंड जोड रस्ता, मध्य वैतरणा धरणावरील संकरित ऊर्जा प्रकल्प असे मिळून सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे पर्यावरणपूरक प्रकल्प मुंबईत सुरू आहेत, अशी माहिती देत वातावरण कृती आराखडा अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कोठेही कमी पडणार नाही, असे आश्वासनही आयुक्तांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button