इंटरनेटच्या वापरामुळे मुलांचे मैदानी खेळ हरवताय
मुंबई: "आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चांगली नवीन पिढी घडविणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे," असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केले. त्या 'सेफ वेब फॉर चिल्ड्रन' या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या. त्यांनी नमूद केले की आजकाल मुलं मैदानी खेळाऐवजी मोबाइलमध्ये गेम खेळतात, त्यामुळे मुलांचे बालपण हरवतेय. त्यातून मुलांचे लैंगिक शोषण आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत.

'सेफ वेब फॉर चिल्ड्रन' कार्यक्रमाचे उद्घाटन
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास आयुक्तालय आणि चाइल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेफ वेब फॉर चिल्ड्रन' या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ सह्याद्री अतिथीगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अदिती तटकरे, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
_1723029225.jpeg)
मुलांच्या सायबर सुरक्षेचे महत्त्व
अदिती तटकरे म्हणाल्या की, "आपण पाहतो की, जन्मलेल्या मुलांचे सोशल मीडियावर अकाऊंट असतात. लोक लाईक आणि शेअरच्या मागे लागले आहेत. परंतु, सायबर सेफ्टीचे महत्त्व काय आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. सरकार चाइल्ड पॉलिसी सुरू करत असून बालहक्क संरक्षण आयोग आणि चाइल्ड फंड इंडिया यांनी याबाबत माहिती द्यावी."
मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याची गरज
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी म्हटले की, "मुलांना अपराधापासून दूर नेणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईत हे काम नक्कीच सुरू आहे. मुलांच्या बाबतीत होणारे गुन्हे जवळून पाहिलेले आहेत. ॲड. सुशीबेन शाह यांनी न्याय देण्यासाठी आधुनिक पद्धत सुरू केली आहे."
इंटरनेटच्या वापराचे परिणाम
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी सांगितले की, "आज कोणीही इंटरनेट शिवाय राहू शकत नाही. आपल्या कुटुंबात तीन ते चार मोबाईल असतात. बहुतांश सायबर गुन्हे हे आर्थिक आणि लैंगिक छळ यावर आधारित असतात. ऑनलाइन लैंगिक छळामध्ये मुलांना असुरक्षिततेला सामोरे जावे लागते."
सायबर गुन्ह्यांवरील उपाय
महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे आणि सायबर क्राईम मुंबईचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, पालकांनी घ्यावयाची काळजी, सायबर क्राईम कशी कार्य करते याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, मुलांसाठी सुरक्षित इंटरनेट वापराच्या उपाययोजना आणि हेल्पलाइन बद्दल माहिती दिली.
"सेफ वेब फॉर चिल्ड्रन" हा उपक्रम मुलांना इंटरनेटच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पालक आणि मुलांना सायबर सुरक्षा आणि सुरक्षित इंटरनेट वापराचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे.