Mumbai

एक झुंजार शिल्पकार , स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे रत्न , लोकमान्य एकचं होऊन गेले...

News Image

  “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” असे इंग्रजांना अतिशय धाडसाने आणि आत्मविश्वासाने सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच लोकमान्य टिळक. 

 बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते.  

टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो.महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले.

टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात.  

 टिळकांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ची पदवी मिळवली . डेक्कन कॉलेजमध्ये असतानाच टिळकांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली. या मैत्रीच्या मदतीनेच त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम केले. सन 1880 मध्ये त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि टिळकांचे सामाजिक जीवन एक शिक्षक आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले. 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले व यात कोणताही पगार न घेत ते काम करू लागले.

देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले. याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरा करणे सुरू केले.

साल 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी सर्व शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.

1897 साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले. आपल्या वृत्तपत्रातून इंग्रजांवर टीका करणे सुरू केले. यामुळेच इंग्रजांनी टिळकांना कारावासाची शिक्षा ठोठावली. मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

अशा पद्धतीने इंग्रजांशी लढत असताना, इसवी सन 1920 साली दीर्घ आजाराने लोकमान्य टिळकांचे निधन झाले. पंडित नेहरू व महात्मा गांधींना ही बातमी कळताच. नेहरूंनी "भारतातील एक तेजस्वी सुर्याचा अस्त झाला" असे उद्गार काढले. त्यांच्या मृत्यूने दुःखी होऊन गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी दिली. टिळकांच्या अंत्ययात्रेसाठी दोन लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते

 भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणार्या या महान नेत्याला असंतोषाचे जनक मानले जाते. असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. 

 अश्या ह्या महान नेत्याला माझे शतश नमन  . !

Related Post