Mumbai

गरजवंत विद्यार्थ्यांचा "आधार"

News Image

गिरगाव, मुंबई | सोमवार दि. १६ जुन 
गिरगावमधील नामवंत सामाजिक संस्था ‘आधार’ च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय श्री रामचंद्र तेंडुलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ते आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम म्हणजे आज ३५ वर्षांहून अधिक काळ ही संस्था गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे.

या कार्यक्रमास आधारचे पदाधिकारी माजी नगरसेवक दिलीप नाईक, नितीन शिरोडकर, प्रवीण मंत्री, महेश मंत्रवादी, अशोक मंत्री, कमलेश राणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या वर्षी दहावी आणि बारावीमध्ये ९०% आणि त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या २० विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना रोख रक्कम प्रदान करून गौरवण्यात आले. त्याचबरोबर १९० गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यही देण्यात आले.

कार्यक्रमात माजी नगरसेवक व आधारचे उपाध्यक्ष दिलीप नाईक यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणारे उद्दगार काढले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले:
"गिरगावचा प्रत्येक विद्यार्थी हा हुशार आहे, मेहनती आहे. गरज आहे फक्त आधारसारख्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या संस्थांची. शिक्षण हीच खरी ताकद आहे आणि आपण या मुलांच्या शिक्षणात हातभार लावू शकलो, हे आमचं भाग्य आहे. गिरगावचा विकास शिक्षणातूनच घडणार आहे.”

या उपक्रमातून ‘आधार’ संस्थेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की समाजसेवा म्हणजे केवळ घोषणांमध्ये नसते, ती कृतीतून दिसते.  शहराच्या मध्यभागी असलेल्या गिरगावसारख्या ऐतिहासिक परिसरात जेव्हा शिक्षणासाठी असे उपक्रम होत असतात, तेव्हा तो परिसर फक्त सांस्कृतिक नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्याही पुढे जातो. ‘आधार’चा हा उपक्रम खरंच इतरांसाठी आदर्श ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Related Post