मराठी कलाविश्वातून सर्वांना धक्का देणारी एक बातमी समोर आली. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले आहे. मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका अगदी लीलया पार पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम . अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आले. अभिनेते विजय कदम 67 वर्षांचे होते. पत्नी आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी - ओशिवरा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारुन आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे विजय कदम काही काळ मनोरंजन सृष्टीपासून लांब होते आणि याचं कारण म्हणजे त्यांचं आजारपण. विजय कदम यांनी कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली. विजय कदम यांनी बालकलाकार म्हणून सिनेविश्वात पदार्पण केले. ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका साकारुन त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.
त्यानंतर सिनेविश्वात त्यांनी त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरुच ठेवला. विनोदी अभिनयाने त्यांनी आजवर प्रेक्षकांना खळखळवून हसवले. आज हा हास्यवीर काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघ राजा राणी हे चित्रपट खूप गाजले. त्यांचं जाणं सिनेसृष्टीसाठी मोठी हानी असल्याची भावना काही कलाकारांनी व्यक्त केली आहे.