दाभोलकर हत्या प्रकरण: निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या मुक्ततेला दाभोलकर कुटुंबीयांचे आव्हान
दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेविरोधात दाभोलकर कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विशेष सत्र न्यायालयाने तीन आरोपींना निर्दोष मुक्त केले होते, तर दोन दोषी आरोपींना कठोर शिक्षा सुनावली होती. मात्र, या निर्णयाला दाभोलकर कुटुंबीय संतुष्ट नाहीत आणि त्यांनी या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ करण्यात आली होती. या प्रकरणात तब्बल अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, 10 मे 2024 रोजी, विशेष सत्र न्यायालयाने आपला निकाल दिला होता. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन दोषी आरोपींना जन्मठेप आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
याच निर्णयाविरुद्ध, दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांची हत्या ही सुनियोजित षडयंत्राचा भाग होती, ज्यात सनातन संस्था आणि तत्सम संघटनांचा हात होता. त्यांनी दोषी आरोपींना मदत केल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. याशिवाय, न्यायालयाने सनातन संस्थेशी संबंधित आरोपींना निर्दोष मुक्त केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
सीबीआयने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या याचिकेवर सुनावणी 23 ऑगस्ट 2024 पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतरही सीबीआयने त्याविरोधात अपील दाखल केले नव्हते, त्यामुळे अखेर दाभोलकर कुटुंबीयांनी स्वतःच ही याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या वडिलांची हत्या ही कोणत्याही साध्या कारणामुळे नव्हे तर एका मोठ्या षडयंत्राचा भाग होती, ज्यात काही विशिष्ट संघटनांचा हात आहे.