विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात केलेल्या शिवीगाळवर त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली आहे. "अंबादास दानवे यांनी केलेल्या शिवीगाळवर मी महाराष्ट्रातील माता भगिणींची माफी मागतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण सत्ताधारी काही आमदारांनीदेखील महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. दानवे यांच्या शिवीगाळनंतर विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित केलं. विधान परिषदेच्या सभापतींच्या या कारवाईवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांवर षडयंत्र रचून निलंबनाची कारवाई करण्यात आली, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केली. याचवेळी त्यांना दानवे यांनी केलेल्या शिवीगाळबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील सर्व माता भगिणींची माफी मागितली. यासोबतच त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांची नावे घेत त्यांनीदेखील माफी मागावी किंवा त्यांच्यावरही अंबादास दानवे यांच्यासारखी कारवाई व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.