Mumbai

बंदाच्या विरोधात न्यायालयात आव्हान: महाराष्ट्रातील बंद बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

News Image

बंदाच्या विरोधात न्यायालयात आव्हान: महाराष्ट्रातील बंद बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

मुंबई: बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदाविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदावर्ते यांनी दावा केला आहे की, हा बंद आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय हेतूने प्रेरित आहे, तसेच बंदामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी अडीच वाजता ठेवली आहे. न्यायालयाने या सुनावणीत बंदाच्या बेकायदेशीरतेबाबत तात्काळ निर्णय देण्याची शक्यता आहे. महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू मांडताना बंद पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आणि बंदकर्त्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला.

न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राजकीय आरोप न करण्याचा सल्ला दिला आहे आणि बंदाच्या बेकायदेशीरतेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बंदाबाबतचे निर्देश दिले आहेत आणि राज्य सरकार स्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहे.

सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना महाविकास आघाडीने हा बंद पुकारणे गलिच्छ राजकारणाचे द्योतक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी बंदामुळे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि सार्वजनिक सेवांवर होणाऱ्या परिणामांची चिंता व्यक्त केली आहे. तसेच, हा बंद सामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर महाराष्ट्र बंदाबाबतचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Post