'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये रंग भरू लागले आहेत आणि स्पर्धकांनी आपला खेळ सुरु केला आहे. या सीझनमध्ये काही दिग्गज सेलिब्रिटींचा समावेश असला तरी 'गुलिगत धोका' फेम सूरज चव्हाणची चर्चा सध्या सर्वाधिक होत आहे. सुरुवातीला बिग बॉसच्या घरात शांत असणारा सूरज टास्कच्या वेळी अचानक सक्रिय झाला आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत तो एकटाच वाटत होता, पण आता त्याने घरातील सदस्यांचे मत बदलायला भाग पाडले आहे.
सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर सूरजला ट्रोल करण्यात आले आणि बिग बॉसच्या घरात त्याच्यावर गेम न समजण्याचा आरोप करण्यात आला. पण त्याने स्वतःवर मेहनत घेतली आणि खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने सूरजच्या खेळीचे कौतुक केले आणि त्याला 'गुलिगत' पॅटर्नने खेळण्याचे प्रोत्साहन दिले.
नव्या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसतो. यावेळी 'कोकण हार्टेड गर्ल' आणि यंदाच्या सीझनच्या पहिल्या कॅप्टन अंकिता प्रभू वालावलकर आणि अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे चर्चा करत आहेत. अंकिता म्हणते, "सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं." पॅडी उत्तरतो, "बिचारा, बाहेरही हेच काम करत असेल. त्याने काल मला सांगितले, 'दादा मला खूप वाईट वाटतं, मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता.'" पॅडी सूरजच्या निरागसतेवर आणि स्वच्छ मनावर भाष्य करतो, तर अंकिता म्हणते, "सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली."
'टिक टॉक'वर पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार, म्हणजेच गुलिगत सूरज चव्हाण, याला नेटिझन्सकडून चांगला पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतून आलेला सूरज चव्हाण आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातही चमकून दिसत आहे. सोशल मीडियावर त्याला भरपूर समर्थन मिळत आहे.