महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
मुंबई, १३ ऑगस्ट २०२४ (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या २ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयानुसार त्यांना हा सन्मान मिळाला आहे. या निर्णयानुसार डॉ. गोऱ्हे यांना वित्त विभागाच्या नियमांनुसार सर्व सेवा सुविधा अनुज्ञेय राहणार आहेत.
डॉ. नीलम गोऱ्हे या २००२ पासून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्या आहेत आणि सध्या त्यांच्या सदस्यत्वाची चौथी टर्म सुरू आहे. त्या २०१९ पासून विधानपरिषद सभागृहाच्या उपसभापतीपदी कार्यरत आहेत. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या एका अधिकृत ज्ञापनात या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
डॉ. गोऱ्हे यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत त्यांना हा महत्त्वाचा सन्मान मिळाला असून, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा हा एक नवा टप्पा मानला जात आहे.