कोकणी समाजाविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावर मुनव्वर फारुकीची माफी
स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 18 चा विजेता मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा वादात अडकला आहे. महाराष्ट्रातील कोकणी समाजावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे कोकणी समाजाने नाराजी व्यक्त करत त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजप आणि मनसे नेत्यांनी देखील या प्रकरणात हस्तक्षेप करत फारुकीला कठोर शब्दांत इशारा दिला.
मुनव्वरने एका कॉमेडी शो दरम्यान, कोकणी समाजाविरोधात अपशब्द वापरून त्यांची खिल्ली उडवली होती. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यामुळे राजकीय पक्षांनी कडक भूमिका घेतली. शिवसेना, भाजप, आणि मनसे नेत्यांनी फारुकीच्या या कृतीवर जोरदार टीका केली. विशेषतः मनसेचे नेते प्रशांत गांधी यांनी तर मुनव्वरला 24 तासांच्या आत माफी मागण्याचा इशारा दिला होता. गांधी यांनी मुनव्वरला कुठेही दिसल्यास चोपण्याची सूचना दिली, तसेच जनतेला अशा लोकांना सोशल मीडियावर पाठिंबा न देण्याचे आवाहन केले.
भाजप नेते नितीश राणे यांनी देखील फारुकीला 'हिरवा साप' असे संबोधून त्याला लवकरच धडा शिकवू असे वक्तव्य केले. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या मुलगा समाधानने देखील फारुकीला कोकणी जनतेची माफी मागावी लागेल, अन्यथा त्याला तुडवले जाईल असा इशारा दिला होता.
या सर्व गोंधळानंतर मुनव्वर फारुकीने आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिले की, आपला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. त्याने दिलगिरी व्यक्त करत कोकणी समाजावरील आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. "मी कोकणी समाजाबद्दल काही चुकीचे बोललो असेल, परंतु माझा हेतू लोकांना हसवण्याचा होता, दुखावण्याचा नव्हता," असे मुनव्वर म्हणाला.
मात्र, या माफीनंतरही राज्यातील राजकीय वातावरण शमलेले नाही. मुनव्वरच्या या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांच्या पुढील कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.