किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आदिवासी वाडीपासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर कड्यावरून एक मोठी दरड कोसळली. ही घटना बुधवारी (दि. 7) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी बांधवांना कोणतीही हानी झालेली नाही, अशी माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.
महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्याशी संपर्क साधून कोसळलेल्या दरडीची माहिती घेतली. दरड मोठी आहे, पण वस्ती त्या ठिकाणापासून दूर असल्यामुळे कोणालाही इजा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, तलाठी आणि कोतवालांना घटनास्थळी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामसेवक व्हि. डी. जाधव यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले की, या परिसरातील दोन आदिवासी वाड्यांमध्ये सुमारे 70 ते 75 कुटुंब, म्हणजेच 300 जण राहत आहेत. जगताप, जाधव, आणि वाघमारे कुटुंब या आदिवासी वाड्यांमध्ये राहतात. वरच्या वाडीतील 4 कुटुंबांना सुरक्षिततेसाठी खालच्या वाडीमध्ये हलवण्यात आले आहे.
चरच्या वाडीतील स्थानिकांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येईल, असे ग्रामसेवक जाधव यांनी स्पष्ट केले. स्थानिक ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून शासकीय यंत्रणा पूर्णपणे सजग आहे, असे ग्रामसेवक व्हि. डी. जाधव आणि तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले.
आदिवासी वाडीमधील 16 जण निजामपूर येथे स्थलांतरित
निजामपूर आदिवासी वाडीच्या पाचशे मीटर अंतरावर झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर, शासनाने वरच्या वाडीतील काटकर, जाधव, आणि पवार या तीन कुटुंबातील 16 जणांना निजामपूर येथे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे, अशी माहिती ग्रामसेवक व्हि. डी. जाधव यांनी दिली. या सर्वांना निजामपूर येथील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, त्यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.