'जीव माझा गुंतला' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री योगिता चव्हाण सध्या बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील तिचा सहकलाकार सौरभ चौघुले याच्याशीच तिने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पाचच महिन्यात तिने बिग बॉसच्या घरात एन्ट्री मारली. योगिता पहिल्याच दिवशी नवऱ्याच्या आठवणीत रडली होती. मात्र नंतर तिचा खेळ रंगला. कालच्या एपिसोडमध्ये योगिताने चांगला खेळ केला. तरी बिग बॉसमध्ये वापरण्यात येणाऱ्या घाणेरड्या भाषेवरुन तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
'जीव माझा गुंतला' मालिकेत योगिता आणि सौरभ मुख्य भूमिकेत होते. रील लाईफ मधली ही जोडी रिअल लाईफमध्येही प्रेमात पडली. त्यांच्या लग्नानंतर चाहते खूश झाले होते. सध्या योगिता बिग बॉसमध्ये असून समीर तिला बाहेरुन सपोर्ट करताना दिसतोय. योगिता वोट करण्याचं आवाहनही तो चाहत्यांना करतो. दरम्यान काल सौरभने या शोमध्ये असलेल्या भाषेवर आक्षेप घेत पोस्ट लिहिली. सौरभ चौघुलेने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले,'लायकी, भीक, आणि घाणेरडी भाषा वापरली जाते... खरंच हा फॅमिलीसोबत बघता येणारा प्रोग्राम आहे का?' असं त्याने लिहिलं.

काल बिग बॉसच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क रंगला. यावेळी योगिताने उत्तम खेळ केला. शेवटच्या टप्प्यात तिच्याकडे कॅप्टन निवडण्याची पॉवर होती तेव्हा तिने अंकिता निवडलं. अशा प्रकारे अंकिता प्रभू वालावलकर या सीझनची पहिली कॅप्टन झाली. तसंच सध्या घरात दोन ग्रुप पडले आहेत. निक्की तांबोळी, अरबाज, जान्हवी, पुढारी घनःश्याम, वैभव चव्हाण यांचा एक ग्रुप आहे. तर इतर सर्व दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत.