Mumbai

मुंबईच्या लोकल ट्रेन: जीवनवाहिनी की मृत्यूवाहिनी? - 20 वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचे बळी

News Image

मुंबईच्या लोकल ट्रेन: जीवनवाहिनी की मृत्यूवाहिनी? - 20 वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचे बळी

मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी उपनगरीय लोकल ट्रेन यंत्रणा, ज्यावर लाखो मुंबईकरांचा दररोजचा प्रवास अवलंबून आहे, तीच आता एक गंभीर समस्या बनली आहे. गेल्या 20 वर्षांत या मार्गांवर २३,000 पेक्षा अधिक प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

वर्षभरात 940 जणांचा मृत्यू; हायकोर्टाची गंभीर दखल

पश्चिम रेल्वेने नुकत्याच उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात 940 प्रवाशांनी लोकल ट्रेनमधील अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. या अपघातांमध्ये रेल्वे रूळ ओलांडणे, ट्रेनमधून पडणे, खांबाला धडकणे यांसारख्या दुर्घटनांचा समावेश आहे. या आकडेवारीने हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे आणि रेल्वे प्रशासनाला प्रवासी सुरक्षेबाबत सखोल विचार करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या 20 वर्षांत 23,000 मृत्यू - पश्चिम रेल्वेचा अहवाल

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गेल्या 20 वर्षांत 23,000 पेक्षा अधिक प्रवाशांनी आपला जीव गमावल्याची माहिती सादर केली आहे. याच काळात 26,572 प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणाऱ्या मृत्यूदराने जगातल्या सर्वाधिक मृत्यूदरांपैकी एक ठरला आहे, अशी माहिती हायकोर्टाने दिली आहे.

मध्य रेल्वेवरील आणखी भीषण परिस्थिती

मध्य रेल्वेवरील परिस्थितीही चिंताजनक आहे. 2009 ते 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवर 29,321 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे दर्शवतात की, पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील अपघाती बळींची संख्या अधिक आहे. मध्य रेल्वेवरील मृत्यू आणि अपघातांची कारणेही पश्चिम रेल्वेसारखीच आहेत, जसे की रूळ ओलांडणे, ट्रेनमधून पडणे इ.

प्रवासी सुरक्षेबाबत हायकोर्टाचे आदेश

लोकल ट्रेनमधील अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला सखोल उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करून गर्दी कमी करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. मात्र, या सूचनांची अंमलबजावणी फार कमी प्रमाणात झाली आहे, असे कोर्टाने नमूद केले.

रेल्वेची उपाययोजना आणि जनजागृती

रेल्वे प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि जनजागृती मोहीम राबवली आहे. तरीही, प्रवाशांच्या सहकार्याशिवाय या प्रयत्नांना यश येणे कठीण ठरत आहे. अपघात रोखण्यासाठी शाळा, कॉलेज, बँक यांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने केली आहे, ज्यामुळे लोकलमधील गर्दी कमी होईल.

मुंबईतील लोकल ट्रेन यंत्रणा, जरी जीवनवाहिनी असली तरी तीच आता मृत्यूवाहिनी बनली आहे, असे चित्र या आकडेवारीने उभे केले आहे. त्यामुळे प्रवासी सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

Related Post