मुंबईकरांचं स्वप्न साकार: आजपासून धावणार मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो
मुंबई: अखेर मुंबईकरांच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर, मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो आजपासून प्रवाशांसाठी खुली होत आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. आज म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून आणि बीकेसी मेट्रो स्थानकावरून पहिली मेट्रो गाडी धावणार आहे, ज्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.

प्रवाशांसाठी 'मेट्रो कनेक्ट ३' ॲपची सोय
मुंबईकरांचा मेट्रो प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) 'मेट्रो कनेक्ट ३' नावाचे ॲप सादर केले आहे. हे ॲप इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना आरे ते बीकेसी दरम्यान असलेल्या सर्व मेट्रो स्थानकांची आणि तेथील सोयीसुविधांची सविस्तर माहिती मिळणार आहे. तिकीट दर, गाड्यांचे वेळापत्रक, जवळचे मेट्रो स्थानक कोणते आहे, इत्यादी माहिती यावर सहज उपलब्ध होईल.
याचबरोबर ॲपद्वारे प्रवाशांच्या तक्रारी सुद्धा नोंदवल्या जातील आणि त्यांचे निवारण देखील करण्यात येईल. मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर पुढे जाण्यासाठी बस, टॅक्सी, रिक्षा उपलब्ध आहेत की नाही, याचीही माहिती ॲपद्वारे मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी क्यूआर कोड स्कॅनिंग तिकीट प्रणाली, ई-तिकीट सेवा, आणि ईव्हीएम मशीन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबईकरांमध्ये उत्साह, गर्दीची शक्यता
मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो सुरू होत असल्याने मुंबईकरांमध्ये मोठा उत्साह आहे. आज बीकेसी आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेट्रोच्या या पहिल्या टप्प्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुयारी मेट्रो सुरू झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.