Mumbai

मुंबईत पावसाचा कहर: उघड्या नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

News Image

मुंबईत पावसाचा कहर: उघड्या नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहराच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण केली. पावसामुळे अंधेरी एमआयडीसी परिसरात ४५ वर्षीय विमल गायकवाड यांचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला. साचलेल्या पाण्यामुळे नाला व रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने, विमल गायकवाड या नाल्यात पडून वाहून गेल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोध मोहिम राबवत त्यांना बाहेर काढून कूपर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी मुंबई महापालिकेवर नाल्यावर झाकण नसल्याच्या दुर्लक्षाबद्दल टीका केली आहे.

मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली, आणि रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. कुर्ला, नेहरूनगर, चेंबूरसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. चुनाभट्टी स्टेशन परिसरात तर रेल्वे प्रवाशांना पाणी रुळांवरून चालत जावे लागले.

मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली, मात्र त्यासाठी तीन तासांचा अवधी लागला.

महापालिका आणि पोलिसांचे आवाहन

भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आणि पोलिसांनी नागरिकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

Related Post