पोलीस कोठडीत वाढत्या मृत्यूंचे सावट: महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूंच्या संख्येने गंभीर चिंता निर्माण केली आहे. 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्रात 80 लोकांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे, ज्यामुळे राज्याचा क्रमांक देशात दुसरा लागतो. गुजरातमध्ये सर्वाधिक 81 मृत्यूंची नोंद झाली आहे, तर देशभरात एकूण 687 लोक पोलिस कोठडीत दगावले आहेत.

अलीकडेच बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. ही घटना पोलिस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंच्या चर्चेला नव्याने उधाण आणणारी ठरली आहे. अशा प्रकारच्या घटनांनी समाजाच्या नजरेत पोलिस दलाविषयी असलेल्या शंका वाढवल्या आहेत.
कोठडीत आत्महत्या आणि चकमकीत मृत्यू
मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अनुज थापन याने 1 मे 2024 रोजी पोलिस कोठडीत आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे, अकोला जिल्ह्यातील अकोट येथे 19 वर्षीय गोवर्धन गणेश हरमकर याचा जानेवारी 2024 मध्ये पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह एका शिपायाला अटक करण्यात आली होती.
मुंबईत आणखी एका प्रकरणात, हवाई सुंदरीच्या हत्येचा आरोपी विक्रम अटवाल याने 8 सप्टेंबर 2023 रोजी अंधेरीत पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचप्रमाणे, दीपक जाधव याने 28 जुलै 2023 रोजी बोरिवली येथे कोठडीत असताना आत्महत्या केली होती. अशा घटना पोलिस कोठडीतील परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करतात.

पोलिस चकमकींचे इतिहासातील सावट
मुंबईत 1999 मध्ये गुंडांविरुद्ध मोठ्या प्रमाणात पोलिस चकमकी झाल्या. त्या काळात 83 गुंड मारले गेले, ज्यामुळे गुन्हेगारी घटकांमध्ये पोलिसांची धास्ती निर्माण झाली होती. 2000 आणि 2001 मध्येही पोलिस चकमकींमध्ये अनुक्रमे 73 आणि 94 गुंडांचा खात्मा झाला. मात्र, नंतरच्या काळात पोलिसांवर अनेक आरोप झाले, ज्यामुळे चकमकींवर मर्यादा आल्या.
या वाढत्या घटनांमुळे पोलिस दलासमोर कठीण प्रश्न उभे आहेत. कोठडीत असलेल्या आरोपींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे, आणि पोलिसांची भूमिका अधिक पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण होणे गरजेचे ठरले आहे.