Mumbai

पोटात लपवलेले १० कोटींचे कोकेन: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

News Image

पोटात लपवलेले १० कोटींचे कोकेन: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

ब्राझीलहून मुंबईत आलेल्या महिलेचा मोठा ड्रग्ज रॅकेट उघड

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्राझीलच्या महिलेकडून तब्बल १० कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ३६ वर्षीय जॅकलिन माल्टेज टायगर या महिलेने आपल्या पोटात १२४ कोकेनच्या कॅप्सूल लपवून आणल्या होत्या. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) या महत्त्वपूर्ण कारवाईत हे अमली पदार्थ जप्त केले.

संशयास्पद हालचालींमुळे उघड झाला खटला

जॅकलिन टायगर ही साओ पाउलोहून मुंबईत पोहोचली होती. तिच्या हालचाली विमानतळावर डीआरआय अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तिच्या अंगझडतीत काहीही आढळले नाही, मात्र पोटात काहीतरी लपवल्याचा संशय आल्याने तिला वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत तिच्या पोटात १२४ कोकेनच्या कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले, ज्याची किंमत जवळपास ९.७ कोटी रुपये आहे.

पैशांसाठी जोखीम

चौकशीत, जॅकलिनने आपली आर्थिक परिस्थिती बिघडलेली असल्याने तीने हे धोकादायक काम करण्यास सहमती दिल्याचे मान्य केले. तिला अटक करण्यात आली असून तिच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. तस्करीचा हा प्रकार अधिकाऱ्यांना वेळीच लक्षात आल्यामुळे एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

कोकेन तस्करीची वाढती प्रकरणे

मुंबई विमानतळावर ड्रग्ज तस्करीचे प्रकार वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा अधिक कडक करण्यात येणार आहे. कोकेन तस्करीमध्ये सहभागी असणाऱ्या मुख्य आरोपींचा शोध घेणे महत्त्वाचे ठरले आहे, ज्यामुळे असे गंभीर गुन्हे रोखता येतील.

Related Post