विनापरवानगी ड्रोन उडवणे महागात; पाच जणांवर गुन्हे दाखल
गणेशोत्सवात गिरगाव चौपाटीवर ड्रोन उडवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई
मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन उडवण्यास कडक बंदी घालण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत स्पष्ट आदेश जारी केले होते. मात्र, या आदेशांचा भंग करून काही व्यक्तींनी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान विनापरवानगी ड्रोन उडवले. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

गणेश विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांना ड्रोन उडवणारे व्यक्ती आढळले. पहिल्या घटनेत, पोलीस शिपाई कुश पाटील यांनी तीन जणांना ड्रोन उडवताना पकडले. त्यांच्या कडे विचारपूस केली असता, त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांचा ड्रोन जप्त करून गुन्हा नोंदवला. दुसऱ्या घटनेत, पोलीस शिपाई अजरुद्दीन नगारजी यांनी दोन व्यक्तींना ड्रोन उडवताना आढळले. या दोघांच्याही विरोधात गुन्हे दाखल करून दोन ड्रोन जप्त करण्यात आले.
सुरक्षेचे आदेश मोडल्यामुळे कठोर कारवाई
गणेशोत्सवाच्या आधीच पोलिसांनी परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास बंदीचे आदेश जारी केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. तरीही, काही व्यक्तींनी या आदेशांकडे दुर्लक्ष करून विनापरवानगी ड्रोनद्वारे चित्रीकरण केले. यामुळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २२३ व ३(५) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली.

ड्रोन उडवणाऱ्यांसाठी धडा
मुंबईत गणेशोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र सुरक्षा हे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. ड्रोन उडवण्यास कडक बंदी असतानाही काही जणांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली. यामुळे भविष्यात कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा मिळेल याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.